॥ श्री स्वामिनारायणो विजयते ॥

॥ सत्सङ्गदीक्षा ॥

प्रकाशकीय

ब्रह्मस्वरुप श्रीप्रमुख स्वामी महाराजांच्या शताब्दी पर्वात, त्यांचे अध्यात्मिक वारसदार प्रकट ब्रह्मस्वरूप श्रीमहंत स्वामी महाराजांद्वारा लिखित हा ग्रंथ आपल्या हाती सोपवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

युगानुयुगे वाहणारी वैदिक सनातन हिंदु धर्माची अध्यात्मिक परंपरेला अनेकशः विस्तारणारे परब्रह्म भगवान श्रीस्वामिनारायण यांनी स्वतःच्या मौलिक अक्षरपुरुषोत्तम दर्शनाने कल्याणाचा एक शाश्वत मार्ग खुला केला आहे. शिक्षापत्री, वचनामृत वगैरेची भेट देऊन त्यांनी सर्वांना सुखी करण्यासाठी सर्वोत्तम आचार, व्यवहार, विचार आणि अध्यात्मिक साधनांविषयी जे मार्गदर्शन केले आहे, त्यामध्ये वेदादिक सर्व शास्त्रांचे सार सामावलेले आहे.

त्याच परंपरेला अनुसरून त्यांचे अनुगामी असलेल्या गुणातीत गुरुवर्यांनीपण दोन-दोन शतकांपर्यंत अध्यात्मिक धारे द्वारा असंख्य मुमुक्षूंना अध्यात्माच्या शिखरावर नेले आहे आणि त्यांना ब्राह्मी स्थिती प्राप्त करवली आहे.

या सकल ज्ञाना द्वारे सर्व मुमुक्षूंना संक्षेपत: अनुभवपूर्ण अध्यात्मिक मार्गदर्शन मिळतच रहावे, म्हणून प्रकट ब्रह्मस्वरुप श्रीमहंत स्वामी महाराजांनी ‘गागरमें सागर’ असलेला हा ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहून आपल्याला भेट दिला आहे.

ह्या ग्रंथनिर्मितीचा प्रारंभ त्यांनी नवसारी येथे संवत् २०७६ वसंत पंचमीच्या पवित्र दिवशी, अक्षरपुरुषोत्तम दर्शनाचे प्रखर प्रवर्तक अशा ब्रह्मस्वरूप श्रीशास्त्रीजी महाराजांच्या प्रकटदिनी दि. ३० जानेवारी २०२० रोजी केला. भगवान श्रीस्वामिनारायणांच्या प्रकटदिनी चैत्र शुक्ल नवमीच्या पवित्र दिवशी दि. २ एप्रिल २०२० रोजी त्याची पूर्तता झाली. अविरत विचरण, सतत चालणारे सत्संगाचे कार्यक्रम, संत-हरिभक्तांसोबतच्या मुलाखती, सतत पत्रव्यवहार आणि बी.ए.पी.एस. स्वामिनारायण संस्थेच्या विराट कार्यवहनासोबत कधी रात्री उशिरापर्यंत किंवा कधी पहाटे जागून त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्या भाषासमृद्धीसाठी आवश्यकतेनुसार संस्थेच्या विद्वान संतांची सेवा पण घेतली आहे. त्यात पूज्य ईश्वरचरणदास स्वामी, पूज्य विवेकसागरदास स्वामी, पूज्य आत्मस्वरूपदास स्वामी, पूज्य आनंदस्वरूपदास स्वामी, पूज्य नारायणमुनिदास स्वामी, पूज्य भद्रेशदास स्वामी वगैरे संतांची नावे उल्लेखनीय आहेत.

हा ‘सत्संगदीक्षा’ ग्रंथ ‘अक्षरपुरुषोत्तम संहिता’ या ग्रंथात भागरूपाने सामावून घेण्यात आला आहे.

‘अक्षरपुरुषोत्तम संहिता’ परब्रह्म स्वामिनारायण प्रबोधित तत्त्वज्ञान आणि भक्तिपरंपरेचे विस्तृत निरुपण करणारा संस्कृत ग्रंथ आहे. संस्थेचे विद्वान संत महामहोपाध्याय भद्रेशदास स्वामींनी परम पूज्य श्रीमहंत स्वामी महाराजांच्या आज्ञेने सत्संगदीक्षा ग्रंथ संस्कृत भाषेत श्लोकरुपाने ग्रथित केला. परम पूज्य श्रीमहंत स्वामी महाराजांनी ग्रंथाच्या मूळ शब्दांसहित ते संस्कृत श्लोक स्वत: तपासून त्याची सार्थकता पडताळून आवश्यक सूचना केल्या व ग्रंथाला अंतिम स्वरूप दिले.

नुकतेच नेनपूर येथे विराजमान असलेल्या स्वामीश्रींनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी, वेदोक्त विधिपूर्वक पूजन करून भगवान श्रीस्वामिनारायण, अक्षरब्रह्म श्रीगुणातीतानंद स्वामी, ब्रह्मस्वरूप श्रीभगतजी महाराज, ब्रह्मस्वरूप श्रीशास्त्रीजी महाराज, ब्रह्मस्वरूप श्रीयोगीजी महाराज आणि ब्रह्मस्वरूप श्रीप्रमुख स्वामी महाराजांच्या चरणी अत्यंत भक्तिभावपूर्वक हा ग्रंथ अर्पण केला आहे.

या ग्रंथाची भेट देऊन परम पूज्य स्वामीश्रींनी आपल्या सर्वांवर आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांवर खूप उपकार केले आहेत. त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक हा ग्रंथ प्रकाशित करताना आम्ही आनंद अनुभवत आहोत. आशा आहे की हा संक्षिप्त ग्रंथ आपल्या जीवन यात्रेला अध्यात्मिकतेच्या मार्गाने अधिक सरळ, सफल आणि सार्थक बनवेल.

- स्वामिनारायण अक्षरपीठ

आषाढ कृष्ण प्रतिपदा, संवत् २०७६

दि. ६ जुलै २०२०

 

निवेदन

‘सत्संगदीक्षा’ हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीस्वामिनारायणांचे सहावे अध्यात्मिक वारसदार प्रकट ब्रह्मस्वरूप श्रीमहंत स्वामी महाराज यांनी गुजराती भाषेत स्वहस्ते लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ परब्रह्म भगवान श्रीस्वामिनारायणांद्वारा प्रबोधित आज्ञा आणि उपासनेच्या सिद्धांतांची प्रस्तुती करतो. हा ग्रंथ महामहोपाध्याय भद्रेशदास स्वामींनी संस्कृत भाषेत श्लोकबद्ध केलेला आहे. हा सत्संगदीक्षा ग्रंथ ‘अक्षरपुरुषोत्तम संहिता’ नावाच्या ग्रंथात एक भाग म्हणून समाविष्ट झालेला आहे. ‘अक्षरपुरुषोत्तम संहिता’ म्हणजे श्रीस्वामिनारायण भगवंतांद्वारा उपदेशीत सिद्धांतांचे आणि भक्तीच्या विविध आयामांचे विस्तारपूर्वक शास्त्रोक्त शैलीतील निरूपण करणारा ग्रंथ आहे.

भगवान श्रीस्वामिनारायणांद्वारा दीक्षित परमहंस सद्‌गुरू प्रेमानंद स्वामींनी म्हटले आहे की,

‘अक्षरना वासी वालो आव्या अवनी पर...

अवनी पर आवी वा’ले सत्संग स्थाप्यो

हरिजनोने कोल कल्याणनो आप्यो राज.’

‘अक्षराधिपती परब्रह्म भगवान श्रीस्वामिनारायण अत्यंत करुणा करून या पृथ्वीवर अवतीर्ण झाले. त्यांनी अनंत जीवांच्या परम कल्याणाचा मार्ग प्रस्थापित केला. त्यांनी स्वतःच परम कल्याणप्रद अशा दिव्य सत्संगाची स्थापना केली. वैदिक सनातन अक्षरपुरुषोत्तम सिद्धांत प्रकाशित केला.’

सहजानंद श्रीहरींद्वारा प्रस्थापित सत्संग म्हणजे एक जगावेगळी अनुभूती आहे. हा स्वामिनारायण सत्संग म्हणजे, वैदिक सनातन अक्षरपरुषोत्तम सिद्धांताने चोखाळलेली एक विशिष्ट जीवनशैली होय. हा विशिष्ट जीवनपद्धती युक्त सत्संग त्यांच्या काळापासून आजतागायत लक्षावधी सत्संगींनी अनुसरली आहे. ह्या सत्संगाचे शाश्वत आणि अनंतकाळापर्यंत पोषण आणि संवर्धन व्हावे यासाठी भगवान श्रीस्वामिनारायणांनी अक्षरब्रह्मरूप गुणातीत गुरुवर्यांची परंपरा या लोकात अखंडित ठेवली आहे.

परब्रह्म भगवान श्रीस्वामिनारायणांना अपेक्षित सत्संगाचे दोन मुख्य पक्ष म्हणजे आज्ञा आणि उपासना. या आज्ञा-उपासनेच्या सिद्धांतांचे निरूपण परावाणी स्वरूप अशा वचनामृत ग्रंथात केले आहे. परमहंसांद्वारे विरचित ग्रंथ, कीर्तने आदींमध्येसुद्धा त्या त्या ठिकाणी हे सिद्धांत प्रतिबिंबित होत आलेले आहेत. अक्षरब्रह्म श्रीगुणातीतानंद स्वामींनी देखील त्यांच्या उपदेशामृतात परब्रह्म भगवान श्रीस्वामिनारायणांच्या सर्वोपरी (सर्वोच्च) स्वरूपासंबंधी तसेच साधनां संबंधी स्पष्टता करून हे सिद्धांत अनेक संत-हरिभक्तांच्या जीवनात दृढ केले. ब्रह्मस्वरुप श्रीभगतजी महाराजांच्या कथा-प्रवचनांद्वारा श्रीगुणातीतानंद स्वामी हे अक्षरब्रह्म आहेत आणि भगवान श्रीस्वामिनारायण हे परब्रह्म पुरुषोत्तम आहेत, असे दिव्य सिद्धांत सत्संग समाजात गाजू लागले. ब्रह्मस्वरूप श्रीशास्त्रीजी महाराजांनी अपार कष्ट घेऊन श्रीहरि प्रबोधित वैदिक सनातन अक्षरपुरुषोत्तम सिद्धांताला शिखरबद्ध मंदिरांद्वारे मूर्तीमान केले. ब्रह्मस्वरूप श्रीयोगीजी महाराजांनी एकोपा, सुहृद्भाव (सौहार्द), आणि एकत्वाचे अमृतपान करवून स्वामिनारायणीय सत्संगाला अजूनच सुदृढ बनवले. त्यांनी बाल-युवा-सत्संग प्रवृत्तींना वेगवान केले. साप्ताहिक सत्संगसभांद्वारे आज्ञा आणि उपासनारुप सत्संगाचे नित्य पोषण व्हावे अशी रीत प्रस्थापित केली.

ब्रह्मस्वरूप श्रीप्रमुख स्वामी महाराजांनी अथांग परिश्रम करून या दिव्य सत्संगाचे जतन आणि पोषण केले. अखिल भूमंडळीं भव्य मंदिरांचे निर्माण करून, वैदिक सनातन धर्माला अनुसरणारे ग्रंथ रचवून, तसेच अनेक युवकांना शीलवान साधुत्वाने सज्ज करून त्यांच्याद्वारे सत्संगाचा व्याप आणि सखोलता या दोन्ही गोष्टींमध्ये वृद्धी केली.

श्रीहरींद्वारा प्रवाहित ही सत्संगभागीरथी सांप्रतकाळी प्रकट ब्रह्मस्वरूप श्रीमहंत स्वामी महाराजांच्या छत्रछायेत अनेक मुमुक्षूंना परम मुक्तीचे पीयूषपान करवीत आहे. एक हजारांहून अधिक संत आणि लाखो हरिभक्तांचा समुदाय सत्संगाच्या सिद्धांतानुसार दीक्षित होऊन धन्यता अनुभवत आहे. एक इष्टदेव, एक गुरु आणि एक सिद्धांत यांना जीवनाचे केंद्र बनवून एकता आणि दिव्यतेचे परमसुख संत-हरिभक्त उपभोगीत आहेत.

आपल्या संप्रदायात श्रीस्वामिनारायण भगवंतांच्या हयातीतच सुरुवातीपासूनच वेळोवेळी आज्ञा आणि उपासनेच्या सिद्धांतांची पुष्टी करणाऱ्या विविध ग्रंथांची रचना होत आलेली आहे. ज्यात तत्त्वज्ञान, आंतरिक साधना, भक्तीची रीत, आचार पद्धती वगैरे बाबींचे निरूपणाद्वारे सत्संगी जीवनशैलीचे प्रतिपादन होत आले आहे. संप्रदायातील अनेक ग्रंथांद्वारे निरोपीत या सिद्धांतांचे सारतत्त्व सरळ शब्दात आणि संक्षिप्तपणे संकलित करून एक ग्रंथ साकार व्हावा, अशी प्रकट ब्रह्मस्वरूप श्रीमहंत स्वामी महाराजांची बऱ्याच काळापासूनची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ संतांशीपण विचारविमर्श करून, सगळ्यांच्या विनंतीनुसार या ग्रंथाचे लेखन स्वहस्ते करण्याची सेवा स्वीकारली.

या ग्रंथात भगवान श्रीस्वामिनारायण साक्षात परब्रह्म पुरुषोत्तम नारायण आहेत, सर्वोपरी (सर्वोच्च), सर्वकर्ता, सदैव दिव्य साकार आणि सदैव प्रकट आहेत, गुणातीत गुरू अक्षरब्रह्म आहेत, परमात्म्याचे अखंड धारक असल्याने प्रत्यक्ष नारायणस्वरूप आहेत, मुमुक्षूंसाठी शास्त्रोक्त ब्राह्मी स्थितीचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी दृढ प्रीती आणि आत्मबुद्धी हेच साधनेचे परम रहस्य आहे, इत्यादी सिद्धांतांची स्पष्टता या ग्रंथात केलेली आहे. ‘अक्षररूप होऊन पुरुषोत्तमांची दास्यभक्ती करावी’ या परम सिद्धांताचे येथे सुस्पष्ट प्रतिपादन केलेले आहे. त्याच बरोबर आंतरिक साधनेसाठी आवश्यक विचार जसे की- परब्रह्मांच्या प्राप्तीचा विचार, भगवंतच कर्ताकरविता आहे हा विचार, भगवंतांना प्रसन्न करण्याचा आणि भगवंतांची मर्जी राखण्याचा विचार, आत्मविचार, जगत नाशवंत असल्याचा विचार, संबंधांच्या महात्म्याचा विचार, गुणग्रहण, दिव्यभाव, दास्यभाव, अंतर्दृष्टी इत्यादींचा समावेश येथे करण्यात आलेला आहे. याशिवाय नकारात्मक गोष्टी न करणे, अभाव-अवगुण न घेणे, भक्तांचा पक्ष राखणे आदी सिद्धांतही समाविष्ट केलेले आहेत. त्याच प्रमाणे मंदिरांच्या स्थापनेचा हेतू तसेच मंदिरातील दर्शनाच्या विविध पद्धती यांचादेखील येथे उल्लेख करण्यात आलेला आहे. सत्संगींनी करावयाच्या नित्यविधी, सदाचार, नियम-धर्म, साप्ताहिक सत्संगसभा, घरसभा, घरमंदिरातील भक्ती करण्याची पद्धती, नित्यपूजा, ध्यान, मानसपूजा आदी नित्य साधनांचा पण यात समावेश केलेला आहे.

या ग्रंथाच्या शीर्षकातील ‘दीक्षा’ या शब्दाचा अर्थ दृढ संकल्प, अचल निश्चय आणि सम्यक् समर्पण असा आहे. सत्संगातील आज्ञा आणि उपासने संबंधित सिद्धांतांना जीवनात दृढ करण्याचा संकल्प करून, त्या सिद्धांतांविषयीचा अचल निश्चय प्राप्त करून, त्या सिद्धांतांसाठीच सम्यक् समर्पित व्हावे असा जीवन संदेश हे या ग्रंथाचे ब्रीद आहे.

अशा प्रकारे भगवान श्रीस्वामिनारायणांद्वारा प्रस्थापित आणि गुणातीत गुरुपरंपरेद्वारा प्रवर्तित सत्संगातील आजपर्यंत जे काही समजावून घेण्यासारखे आहे आणि आचरण करण्यासारखे आहे, त्याचप्रमाणे जे काही लाखो सत्संगी प्रत्यक्ष जीवनात जगत आहेत, असे सर्वकाही ‘गागरमें सागर’ या उक्तीप्रमाणे या ‘सत्संगदीक्षा’ ग्रंथात सामावलेले आहे.

विक्रम संवत् २०७६ आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, दिं ५ जुलै २०२० या पवित्र दिवशी परम पूज्य श्रीमहंत स्वामी महाराजांनी या ग्रंथाचे प्रथम पूजन करून त्याचे प्रकाशन केले. त्याच दिवशी त्यांनी सर्व संतांना तसेच हरिभक्तांना आज्ञा केली की या ग्रंथातील दररोज पाच श्लोकांचे अवश्य वाचन करावे.

हा ‘सत्संगदीक्षा’ ग्रंथ प्रकट गुरुहरि श्रीमहंत स्वामी महाराजांनी श्रीप्रमुख स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त अर्घ्यरूपाने भगवान श्रीस्वामिनारायण तसेच गुणातीत गुरुवर्यांच्या चरणी समर्पित केला आहे.

खरोखर, श्रीहरि आणि अक्षरब्रह्मस्वरूप गुणातीत गुरुवर्यांच्या हृद्‌गत अभिप्रायरुप ‘सत्संगाला’ नित्य जीवनात प्रत्यक्ष जगण्याचा दृढ संकल्प करवणाऱ्या ‘दीक्षेचे’ नित्य स्मरण देणाऱ्या या ग्रंथाची रचना करून प्रकट ब्रह्मस्वरूप गुरुहरि श्रीमहंत स्वामी महाराजांनी समग्र सत्संग समुदायावर महान उपकार केले आहेत. त्यांच्या या उपकारांचे आपण सदैव ऋणी राहू. या ग्रंथाला संस्कृत भाषेत श्लोकबद्ध करणाऱ्या महामहोपाध्याय भद्रेशदास स्वामींचे पण आभार.

वैदिक सनातन धर्माचा अर्क असलेल्या या ‘सत्संगदीक्षा’ ग्रंथाचे नित्य वाचन, मनन, निदिध्यासन करून खऱ्या अर्थाने स्वामिनारायणीय सत्संगाची ‘दीक्षा’ प्राप्त करून घ्यावी, हीच प्रार्थना.

- साधू ईश्वरचरणदास

दिं ५ जुलै २०२०

गुरूपौर्णिमा वि. सं. २०७६

अहमदाबाद, गुजरात

SELECTION

Type: Keywords Exact phrase